उन्हाळ्याची चाहूल लागली की आठवते ती शाळा – कॉलेजात असताना मिळणारी ‘उन्हाळ्याची सुट्टी’. वार्षिक परीक्षा संपली की आम्ही गावाकडे निघायचो; वर्षभर एकांतात असणाऱ्या आंबे , जांभूळ, काजूच्या झाडांची भेट घेण्यासाठी. घामाच्या धारांनी भिजवणाऱ्या उन्हाळ्यात मनाला सुखावणारी जर गोष्ट असेल तर ती म्हणजे ‘ ‘उन्हाळ्याची सुट्टी आणि उन्हाळ्यात मिळणारे आंबे’.
गावाला पोहचलो की कोण कोण भावंडं कधी कधी येणार ? याची विचारपूस पहिले होई. एकत्र कुटुंब असल्याने सख्खे / चुलत, आत्या / काका , त्यांची मुलं अशा सगळ्यांनीच घर भरून जाई.
सगळी भावंडं जमली की यावर्षी रानातील कोणता आंबा जास्त आला आहे हे पाहण्यासाठी वर्षातून पहिल्यांदा रानवाटा तूडवल्या जायच्या. जो आंबा जास्त आला आहे, त्यावर्षी त्यावर जास्त Focus असायचा. रानातील रायवळी आंबे चवीला गोड असले तरी प्रत्यकाची विशिष्ट अशी वेगळी चव आहे. हापूस आंब्यांसारखे रायवळी आंबे दिसायला चकचकीत नसले तरी त्यांची चव मात्र मन तृप्त करणारी असते. हापूस आंबे कधी कधी मला Overrated वाटतात. चवीप्रमाणेच यांची नावं सुद्धा रंजक असतात. दयाळू, चव्हाण्या , घरट्या आंबा , वनातली लिटी , दगडातली लिटी अशी यांची नावं. ‘ लिटी ‘ म्हणजे आकाराने बारीक आंबा. वनातली लिटी म्हणजे आमच्या रानातील MVP आंबा. आकाराने जितका बारीक चवीला तितकाच अप्रतिम. त्याहून चविष्ट आंबा मी आजवर नाही खाल्ला.
सकाळी उठलो की या आंब्यावर जाणे हे आमचं पहिलं काम असायचं. Sorry , यात थोडी दुरुस्ती करावी लागेल; सकाळी उठलो की पहिलं काम असायचं ते अंथरुणाच्या घड्या घालणे. एका लांबलचक सतरंजीवर आम्ही सारे पडवीत झोपायचो. सकाळी उठलो की त्या महाकाय वाटणाऱ्या सतरंजीची घडी कोण घालेल यावरून भांडण व्हायची. मग जो शेवटला उठेल तो घडी घालेल असा नियम ‘ उन्हाळी सुट्टी अधिवेशनात ‘ लावण्यात आला. मग आम्ही आंब्यावर जायचो . रात्री वाऱ्याने पडलेले आंबे नशीब चांगलं असेल तर मिळायचे . नाहीतर आमच्याहून अनुभवी , निष्णात म्हातारी कोतारी आंबे वेचून जायचे किंवा गुरं आंब्यांचा फडश्या पाडायचे. असे सकाळ दुपार संध्याकाळ रानातील वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळ्या आंब्यांवर दिवसातून ३-४ फेऱ्या व्हायच्या. रायवळी आंब्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हापूस प्रमाणे ते पिकल्यावर पिवळसर होतीलच असे नाही. काहींचा रंग पिकल्यानंतर देखील हिरवाच असायचा. त्यामुळे झाडावरील पिकलेला आंबा शोधणं कठीण. अशा झाडावर पिवळा आंबा दिसला की त्याला आम्ही ‘ कौंडाळ ‘ बोलायचो. कौंडाळ आंबा म्हणजे आमचा जीव . असा आंबा दिसला की तो कितीही उंचावर असो, तो पडल्याशिवाय मनःशांती मिळत नसे. बेचकी वगैरे मला कधी जमलीच नाही. हव्या असलेल्या मापाचे दगड घ्यायचे आणि आंब्यावर नेम साधायचा. माझा भाऊ व्हल्टा स्पेशालिस्ट होता ( व्हल्टा म्हणजे फांदीचा तुकडा ). आंब्यावर हात दुखेपर्यंत दगड मारणे, आंब्याची साल न फाटून देता तो चुपून खाणे, पडवीत एकत्र भाकरी खायला बसणे, पडवीत क्रिकेट खेळणे , पत्त्यांचा डाव मांडणे, कैरीला मीठ मसाला लावून दात आंबेपर्यंत खाणे हे आमचं Daily Routine. मीठ लावलेली कैरी खाणे हे सर्वांचंच आवडत काम. तीच कैरी जर सुकटीच्या रश्यात असली तर रश्याची चव कैक पटीने वाढवते. ‘ कैरी आणि सुकट म्हणजे दुग्ध शर्करा योगच !’ दिवसभर उनाडून कपडे एवढे माकायचे की संध्याकाळी अंघोळ करून कपडे बदलण्याशिवाय पर्याय नसायचा. मग स्वच्छ कपडे घालून संध्याकाळी गावच्या रस्त्यावर फेरफटका मारायला जायचो. त्यातही चालता चालता झाडावर एखादा कौंडाळ आंबा दिसला की त्याला पाडण्याचा मोह आवरायचा नाही. २-३ दगड मारून प्रयत्न करायचो तरीही तो धारातीर्थी नाही पडला की त्याला पुढच्या दिवसासाठी नेमून ठेवायचो, कारण घामाघूम होऊन कपडे पुन्हा माकवायची इच्छा नसायची.
रात्रीच्या जेवणाला दिवसभरात गोळा केलेले आंबे एकत्र कापले जायचे . कापलेल्या आंब्यांच्या फोडी, चुपण्यासाठी एक आंबा , लिटीचा एक आंबा अशा सर्व आंब्याची ताटात वर्दळ असायची. मग कोणाच्या वाट्याला कोणता आंबा आलाय याची चर्चा व्हायची. प्रत्येक आंब्याला वेगळा सुगंध असल्याने आमच्या पेक्षा १२ उन्हाळे जास्त पाहिलेले काका मंडळी आंब्याचा सुवास घेऊन तो आंबा कोणत्या आंब्याचा हे ओळखायचे.
रात्री पुन्हा अंथरुणावरून तीच मारामार. कोण अंथरूण टाकणार ही समस्या . मग क्रमाक्रमाने एकेकाची अंथरूण टाकण्याची पाळी लावली जायची. अशी आमची दिवसाची सुरुवात आणि शेवट अंथरुणामुळे होणाऱ्या भांडणातून होई.आता भांडणं होतात पण भांडणांमधला Innocence नाहीसा झाला आहे. आणि अंथरुणावर एकत्र झोपण्यासाठी भावंडांचं एकत्र जमणही कठीण झालं आहे.” उन्हाळा दरवर्षी येतो , पण ती उन्हाळ्याची सुट्टी मात्र पूर्वीसारखी येत नाही ! “