पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ला ऐतिहासिक दृष्टया खूप महत्वाचा आहे . छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या गडावर झाला . आणि इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह देखील इथेच झाला .
गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला समुद्र सपाटीपासून १५०० मी उंचीवर वसलेला आहे.


पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत होते. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत.
बहामनीकाळी बीदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी नीलकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले.

पुरंदरचा तह
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंहाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते. तेव्हा पुरंदरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी प्रभू म्हणून होता. ७०० मावळ्यांनिशी त्यांनी युद्ध केले. परंतु वीर मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले . मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.
८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ‘आजमगड’ ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
सध्या गाडावर भारतीय लष्कराचा ट्रैनिंग कॅम्प आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आर्मीचे चेकपोस्ट आहेत. गडावर जाण्यासाठी ओळखपत्राची गरज भासते. गडावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. परंतु गडावर मोबाइल आणि कॅमेरा नेण्यास बंदी आहे . त्यामुळे फोटो काढता येत नाहीत. संपूर्ण गड पाहण्यासाठी ३ तास पुरेसे आहेत.
गडावर पाहण्यासारखी ठिकाणे
१. दत्त मंदिर
मुख्य चेकपोस्ट पासून पुढे चालत गेल्यावर एक दत्त मंदिर पाहायला मिळते.


२. बिनी दरवाजा
पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे. आत मध्ये पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत.

३. शिव मंदिर
वाटेत छोटेसे शिव मंदिर पाहायला मिळते.

४. वीर मुरार बाजी देशपांडे यांचा पुतळा
इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे. येथून डाव्या बाजूने गडाकडे जाण्यास वाट आहे.

५. पुरंदरेश्वर मंदिर
हे महादेवाचे मंदिर आहे. हे साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.



६. संभाजी महाराजांचा पुतळा
पुरंदरेश्वर मंदिराच्या पुढेच संभाजी महाराजांचा पुतळा आहे . आणि एक छोटी बाग आहे. येथून उजव्या बाजूने गडाकडे वाट आहे. येथे एक चेकपोस्ट आहे . तिथे मोबाइल जमा करावा लागतो . त्यामुळे येथून पुढे फोटो काढता येत नाहीत.

७. दिल्ली दरवाजा
हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
८. केदारेश्वर मंदिर
पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. या केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. केदारेश्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड, कऱ्हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
याखेरीज गडावर पाण्याचे मोठे तलाव आहेत. गडावर जाताना चर्च देखील पाहायला मिळतात.
ऐतिहासिक दृष्टया इतका महत्वाचा किल्ला , मात्र या गडांकडे येणारी पावलं कमी झाली आहेत. या गडांना भेट देऊन यांचा इतिहास जाणून घेण्याची आजच्या पिढीला गरज आहे.